Logo
ताज्या बातम्या

कमर्शियल सिलिंडर 101 रुपयांनी महाग : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिना सुरू होताच तेल कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 101.50 रुपयांची वाढ केली आहे. एलपीजी सिलिंडरच्या नवीन किंमती फक्त 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरवर लागू होतील. तथापि, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे हे नवीन दर बुधवारपासून म्हणजेच 1 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. नवीन दर लागू झाल्यानंतर आता राजधानी दिल्लीत एलपीजीचा व्यावसायिक सिलिंडर 1,833 रुपयांना मिळणार आहे. तेल कंपन्यांनी गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीतही वाढ केली होती. 1 ऑक्टोबरपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 209 रुपयांनी वाढ केली होती. ऑक्टोबरमध्ये नवीन दर लागू झाल्यानंतर, दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1731.50 रुपये झाली होती. हा दर आता नोव्हेंबरमध्ये वाढलेल्या दरानंतर 1,833 रुपये झाला आहे. सलग दोन महिने महाग होत असलेला व्यावसायिक एलपीजी सिलिंडर सप्टेंबरमध्ये स्वस्त झाला होता. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 157 रुपयांची कपात केली होती, त्यानंतर हा सिलिंडर दिल्लीमध्ये 1,522.50 रुपये आणि कोलकातामध्ये 1,636 रुपयांना मिळत होता. ऑगस्टमध्येही व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या.