जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत कमी पाऊस पडलेल्या राज्यातील 19 जिल्ह्यांमधील 224 गावांमध्ये दुष्काळसद़ृश परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव, गोकुळ शिरगाव, शिंगणापूर (ता. करवीर) आणि हातकणंगले तालुक्यातील कुंभोज आणि शिरोली या पाच गावांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे संबंधित गावांतील शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. सहकारी कर्जाचे पुनर्गठन, जमीन महसुलात सूट आदी सवलती मिळणार आहेत. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडलामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75 टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मि.मि.पेक्षा कमी झाले आहे आणि त्या महसुली मंडलात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही, अशा 224 नव्या गावांमध्ये (महसुली मंडलांना) दुष्काळसद़ृश परिस्थिती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी एका शासन आदेशाद्वारे जाहीर केला आहे. यापूर्वी राज्य सरकारने 10 नोव्हेंबर 2023 रोजी एक शासन आदेश जारी करून राज्यातील 24 जिल्ह्यांतील 1021 गावांना या सवलती लागू केल्या होत्या.
ही आहेत पश्चिम महाराष्ट्रातील गावे
जिल्हा पुणे (एकूण 14 गावे)
उरळी देवाची, डोणाजे, खानापूर, कोंढवे, धावडे, अष्टापूर, लोणीकंद, लोणी काळभोर (ता. हवेली). हरणस (ता. भोर). वडज, मढ, ओझर (ता. जुन्नर). वेताळा, करंजविहरे (ता. खेड), निरगुडसर (ता. आंबेगाव).
जिल्हा : सातारा (12 गावे)
करंजे तर्फे सातारा (ता. सातारा), कोडोली. साप (ता. कोरेगाव). येळगाव (ता. कराड). येराड, आवर्डे, मारुल हवेली (ता. पाटण). कोळकी (ता. फलटण). कलेढोण, भोसरे (ता. खटाव), वरकुटे-मलवडी, आंधळी (ता. माण).
जिल्हा सांगली (दोन गावे)
वायफळे (ता. तासगाव), तिकोडी (ता. जत).
जिल्हा : सोलापूर (एकूण 10 गावे)
मजरेवाडी, बाळे, कोंडी, सोरेगाव (ता. उत्तर सोलापूर), औराद (ता. दक्षिण सोलापूर), नागणसूर (ता. अक्कलकोट), अनगर (ता. मोहोळ). खर्डी, रोपळे (ता. पंढरपूर), पाटखळ (ता. मंगळवेढा).