काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी आज मंगळवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई भाजप कार्यालयात आज दुपारी १२ वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अमर राजूरकर हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. दरम्यान, अशोक चव्हाण राज्यसभेसाठी उद्या अर्ज भरणार असल्याचे समजते.
काल सोमवारी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर, ‘भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही’ असे म्हटले होते. तसेच माजी आमदार अमर राजूरकर यांनीदेखील पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे १५ ते १८ आमदार जातील, असे चव्हाण यांच्या गोटातून सांगण्यात येत आहे. यात नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या चार आमदारांचा समावेश असेल. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही भविष्यात भाजपमध्ये जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी आणि मिलिंद देवरा यांनी याआधी काँग्रेसची साथ सोडली होती. आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी नाना पटोले यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली नसली तरी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. अशोक चव्हाण यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसची तत्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिल्लीतून नाना पटोलेंना देण्यात आले, त्यानंतर नाना पटोले पुन्हा मुंबईसाठी रवाना झाले.
श्वेतपत्रिकेत आदर्श गैरव्यवहार प्रकरणी अशोक चव्हाणांचे नाव
गेले काही दिवस अशोक चव्हाण पक्ष सोडतील अशी कुणकुण पक्षातील नेत्यांना होती. केंद्र सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श गैरव्यवहार प्रकरणी अशोक चव्हाणांचे नाव आल्याने पक्ष सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढल्याचे काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे. स्थानिक पातळीवर अशोक चव्हाणांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला असला तरी मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याकडून अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क करण्यात आला का, याबाबत अधिकृत तपशील कळू शकला नाही.
अशोक चव्हाणांमुळे बिघडणार राज्यसभेचे गणित?
अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे आणखी काही आमदार त्यांच्यासोबत जाऊ शकतात. या आमदारांनी राज्यसभा निवडणुकीपुर्वी राजीनामा दिला किंवा वेगळी भूमिका घेतल्यास काँग्रेसची महाराष्ट्रातील राज्यसभेतील एक जागा निश्चित मानली जात असताना अशोक चव्हाण यांच्या भूमिकेमुळे तीही धोक्यात येऊ शकते.