कोल्हापूर शहरालगतची जी गावे महानगरपालिकेच्या सुविधा आधी पासून घेत आहेत, त्यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ कोणत्याही हरकतीशिवाय स्वीकारायला हवी, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित दालन 2024 च्या उद्घाटनानंतर बोलताना मुश्रीफ यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, क्रिडाईचे अध्यक्ष के.पी. खोत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, 1972 पासून शहराची एकही इंच हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे लोकसंख्येची अट पूर्ण न केल्याने केंद्र सरकारच्या निधीचा लाभ शहराला घेता येत नाही. इतर शहरांमध्ये महापालिकेत समावेश होण्यासाठी हद्दीलगतच्या गावांची चढाओढ आहे. दुर्दैवाने कोल्हापुरात महानगरपालिका हद्दीत येण्यासाठी विरोध होत आहे. विरोध करणारे म्हणतात की, तुम्ही महानगरपालिका हद्दीतील गावांना सुविधा देऊ शकला नाहीत, तर बाहेरील गावांना काय सुविधा देणार? असे असेल तर, जी गावे शहराच्या सुविधांचा आधीपासूनच लाभ घेत आहेत त्यांनी हद्दवाढीला विरोध करू नये, असे मुश्रीफ म्हणाले.
मुश्रीफ म्हणाले, माझ्या आधी आमदार सतेज पाटील यांनी भाषण केले, मात्र त्यांनी हद्दवाढीचा विषय वगळून भाषण केले. मी त्यांना विचारले हद्दवाढीच्या विषयावर तुम्ही का बोलला नाहीत, तर ते म्हणाले, की हद्दवाढीचा विषय सर्वसंमतीने मार्गी लागत असेल तर माझा या विषयाला पाठींबा आहे. असे तुम्ही (सतेज पाटील) जाहीर करा. मी आता हद्दवाढीवर भाषण केल्यानंतर उद्या माझ्या घरी शिष्टमंडळ पोहोचू शकते, पण यावर आपल्याला मार्ग काढावा लागेल. निदान जी गावे शहराच्या सुविधांचा फायदा घेत आहेत. त्यांनी विरोध करू नये.
1100 बेडच्या रुग्णालयाचे काम सुरू होणार
कोल्हापूरच्या छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाला स्वतंत्र संलग्न रुग्णालय म्हणून प्रस्तावित असलेल्या 1100 बेडच्या रुग्णालयाची निविदा दोनच दिवसांपूर्वी निघाली असून लवकरच काम सुरू होणार आहे. यात 250 बेड कॅन्सर रुग्णांसाठी, 250 सुपर स्पेशालिटी व 600 बेड सर्वसाधारण आजारांसाठी असतील, असे मुश्रीफ म्हणाले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे 100 कोटींचे आणि कन्व्हेन्शन सेंटरचे कामही लवकरच मार्गी लागेल, असे ते म्हणाले.