Logo
ताज्या बातम्या

शाळांचा किलबिलाट आता नऊनंतरच; निर्णयाची अंमलबजावणी करावीच लागणार

राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे वर्ग सकाळी नऊ वाजल्यानंतर भरवले जावेत, यासाठीचा अध्यादेश गुरुवारी (दि.8) जाहीर झाला. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी आता शाळांना करावीच लागणार आहे. या निर्णयामुळे पालकांसह शिक्षक, रिक्षाचालक, व्हॅनचालक यांना दिलासा मिळाला आहे. या अध्यादेशाची अंमलबजावणी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी राजभवनातील एका कार्यक्रमात भाषणावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याची सूचना केली होती. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन वेळ बदलण्याविषयी अभ्यास केला. त्यानंतर सकाळच्या सत्रातील शाळांची वेळ बदलण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले आहे. शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशानुसार सकाळी नऊपूर्वी भरणार्‍या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते. यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी 9 किंवा 9 नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी 9 वाजण्याच्या अगोदरची आहे, त्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावी. शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन, अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही, याची दक्षता शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी, असे स्पष्ट केले आहे. रिक्षाचालक संघटनेकडून निर्णयाचे स्वागत सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतर सुरू करण्याचा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला. त्याचे पुण्यातील रिक्षाचालक संघटना आणि स्कूल व्हॅनचालकांकडून स्वागत करण्यात आले आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतात, तसेच, मानसिक स्वास्थ्य बिघडते, असे मत राज्यपालांनी व्यक्त केले होते. त्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून अभ्यास करण्यात आला. त्यानंतर याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. काही महत्त्वाचे मुद्दे राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खासगी शाळा सकाळी 7 नंतर भरत असल्याचे दिसून आले. आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनिप्रदूषण उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात. सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बर्‍याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो. मोसमी हवामान, विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे. पावसामुळे व थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो, ते बहुदा आजारी पडतात. सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते. सकाळी लवकर भरणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात. शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा, शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणार्‍या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसर्‍या सत्राचा विचार करावा.