Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : बांधकाम कामगारांना २० हजार अनुदान द्या

बांधकाम कामगारांना दिवाळी सानुग्रह अनुदान वीस हजार रुपये द्यावे. बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना ताबडतोब सुरू करावी. घरासाठी केलेले अर्ज मंजूर करावेत. आदींसह अन्य मागण्यांसाठी लाल सेना बांधकाम कामगार संघटनेतर्फे बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी मागण्याबाबतचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यामध्ये अडीच लाख बांधकाम कामगार नोंदीत आहेत. हातकणंगले, शिरोळ आणि इचलकरंजी या तिन्ही विभागांमध्ये नोंदीत ५० हजार बांधकाम कामगार आहेत. त्यांना तीन वर्षांपासून दिवाळीसाठी कोणतेही अनुदान दिले नाही. प्रत्येक दिवाळीला प्रस्ताव तयार केला जातो. परंतु हा प्रस्ताव कामगार मंत्री मंत्रिमंडळात मांडत नाहीत. त्यामुळे बांधकाम कामगारांची दिवाळी ही निराशेमध्ये करावी लागत आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे २० हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामधून कामगारांना किमान २० हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी संघटनेतर्फे केली आहे. तसेच पाच वर्षांपूर्वी बांधकाम कामगारांना मेडिक्लेम योजना सुरू होती. त्यामुळे त्यांना योजनेचा फायदा मिळत होता. मात्र सध्या बंद आहे, ती सुरू करावी. तसेच कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. पेन्शन, विवाह, प्रसूती या ही लाभापासून बांधकाम कामगार वंचित असल्याचे पत्रात नमूद केले आहे. बैठकीमध्ये हनुमंत लोहार, महेश लोहार, सर्जेराव खोत, दत्तात्रय सुतार आदी उपस्थित होते.