राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परिक्षेचे (CET 2024) अर्ज भरण्याकरीता मुदतवाढ दिली आहे. ६ फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा दिलेली मुदत संपणार होती, आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदवाढ दिली जाणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करावी लागणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (CET 2024) घेण्यात येणार आहे. सदर परीक्षांकरीता उमेदवारांच्या नोंदणी डाटाची तपासणी केली असता अनेक उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आले. तसेच अनेक उमेदवार व पालकांकडून सीईटी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी विनंती करण्यात आली होती. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करुन ऑनलाइन सीईटी परीक्षेकरीता नोंदणीस १२ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण आहेत किंवा ज्यांनी अद्याप अर्ज भरले नाहीत त्यांना १२ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.