एसी आणि तमाम अत्याधुनिक सुविधा असलेली वंदे भारत रेल्वे भारतीयांच्या पसंतीस उतरली असून आता स्लीपर वंदे भारत रेल्वे सुरू होणार आहे. या रेल्वेची एप्रिल महिन्यात चाचणी होणार असून 2025 पासून ती देशात धावू लागेल.
रेल्वे अधिकार्यांनी सांगितले की, सध्या धावत असलेल्या वंदे भारत रेल्वेत स्लिपरची सुविधा नाही. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना या सुविधा मिळत नाहीत; पण आता रेल्वे स्लीपर वंदे भारत तयार करत असून त्यात अत्यंत आधुनिक सुविधांसह उत्तम प्रतीचे शयनयान प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी उपलब्ध होणार आहे. या स्लीपर वंदे भारतची पहिली रेल्वे मार्चपर्यंत तयार होणार असून तिची चाचणी एप्रिलमध्ये होणार आहे. या चाचणीच्या निष्कर्षांनंतर आवश्यक ते बदल करून या नव्या रेल्वेला अंतिम रूप दिले जाईल. साधारणपणे 2025 मध्ये ही रेल्वे देशात धावायला सुरुवात करेल.
दिल्ली-मुंबई किंवा दिल्ली-हावडा मार्गावर
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मध्ये वंदे भारत रेल्वेचे डिझाइनिंग केले जात आहे. या गाडीचा वेग राजधानी एक्स्प्रेसपेक्षाही अधिक राहाणार असल्याने लांब पल्ल्याचा प्रवास करणार्या प्रवाशांचे किमान दोन तास वाचतील. सुरुवातीला दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा यापैकी एका मार्गावर ही स्लीपर वंदे भारत धावेल.
‘या’ असतील सुविधा
प्रवास जास्तीत जास्त आरामदायी होणार
एका रेल्वेला असतील फक्त 16 डबे
3 टियर, 2 टियर आणि एक एसी कोच असतील
आयसीएफ आणि बंगळूरच्या बीईएमएल कारखान्यात स्लीपर कोचची निर्मिती
बर्थ, एअर डक्ट, केबल डक्ट, वॉशरूमच्या नव्या डिझाईनचे काम पूर्ण
सध्या बीईएमएल अशा दहा रेल्वे गाड्यांच्या निर्मितीत व्यस्त