महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढील संवर्गातील एकूण १७४ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ रविवार २८ एप्रिल २०२४ रोजी ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. संयुक्त पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येतील. सामान्य प्रशासन विभाग -राज्य सेवा गट-अ व गट-ब-एकूण २०५ पदे आहेत. मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर २०२४ दरम्यान होणार आहे. परीक्षेसाठी अर्ज करणे सुरू झाले आहे.
हा अर्ज करताना विद्यार्थ्यांच्या खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही ‘इनव्हॅलीड कोर्स रिक्वेस्ट’ किंवा ‘फीस नॉट पेड’ असा शेरा येत असल्यास ‘चेक पेमेंट स्टेटस’ या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची अद्यावत स्थिती कळणार आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्यांच्या ट्विटरवर देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’साठी विविध पदांसाठी अर्ज काढण्यात आले आहेत. यामध्ये जाहिरातीत पदांची पात्रताही देण्यात आली आहे. त्यानुसार वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, कृषिशास्त्र, कृषी, रसायन, स्थापत्य/ ऑटोमोबाईल/संगणक/ पॉवर/ प्रोडक्शन/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स/ यंत्र/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/संगणक विज्ञान व तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरण विज्ञान, पशुवैद्याकीय विज्ञान यापैकी कोणत्याही एका विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.