हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे भरधाव टेम्पोने मोटर सायकलवरून येणार्या तीन महाविद्यालयीन युवकांना जोरदार धडक दिली. या अपघातात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले . यातील एकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
अथर्व उर्फ कार्तिक वैभव बाबर (वय 18, रा.गणेशनगर शहापूर) असे मृताचे नाव असून अखिलेश दशरथ बाबर (17) व आदर्श चंद्रकांत सुतार (17, दोघे रा. गणेशनगर शहापूर) जखमी आहेत. याबाबत टेम्पोचालक आनंदा शंकर खोत (रा. कासारवाडी ता. हातकणंगले) याच्या विरोधात संतोष लक्ष्मण बाबर (रा. गणेशनगर इचलकरंजी) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारी हा अपघात घडला.
एटीएममधून पैसे काढण्यासाठी तिघे इचलकरंजीहून कोरोची येथे मोटरसायकलने (एम.एच. 09 एफके 2251) जात होते. त्याच दरम्यान हातकणंगलेहून कोरोचीच्या दिशेने येणार्या टेम्पोची (एम.एच.12 एसएफ 4614) दोन्ही चाके पंक्चर झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि समोरून येणार्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तिघांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र अथर्वचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले. अथर्वचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी आक्रोश केला.