Logo
राजकारण

सकाळी ११ पासून माझं उपोषण सुरू झालं, तुम्हाला विचारूनच निर्णय घेणार: जरांगे पाटील

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज नवी मुंबईतील वाशी येथे सरकारच्या शिष्टमंडळाशी मागण्यांसंदर्भात चर्चा केली. या शिष्टमंडळामध्ये सामाजिक व न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्यासह इतर अधिकारी होते. शिष्टमंडळाने जवळपास तासभर केलेल्या चर्चेनंतर या चर्चेबाबतची माहिती समाजबांधवांना देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचले. यावेळी पाटील यांनी सांगितलं की, सरकारने आपल्याला काही कागदपत्रे दिली आहेत. त्यात कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत, हे मी वाचून दाखवणार आहे. मात्र आंदोलनाबाबतचा अंतिम निर्णय समाजाला विचारूनच घेणार अशी घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाबाबत नक्की काय घोषणा करतात, हे ऐकण्यासाठी शिवाजी महाराज चौकात लाखोंचा जनसमुदाय लोटला आहे. मात्र साऊंड सिस्टम व्यवस्थितरित्या चालत नसल्याने दुसरी व्यवस्था होईपर्यंत आपण वाट पाहावी, २ वाजता मी तुम्हाला सरकारने घेतलेले निर्णय वाचून दाखवतो आणि मग चर्चा करू, असं आवाहन जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केलं आहे. दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटील यांची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती असून आजच या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.