Logo
ताज्या बातम्या

‘मेरा युवा भारत’ पोर्टल सादर; अमृत कलश यात्रेचा समारोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी दिल्लीतील कर्तव्यपथावर ‘मेरी माटी, मेरा देश अमृत कलश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात भाग घेतला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी कर्तव्यपथ एका ऐतिहासिक महायज्ञाचा साक्षीदार ठरत आहे. अमृत कलशामधील मातीचा प्रत्येक कण अनमोल असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत. यादरम्यान मोदींनी देशभरातून आणलेल्या मातीला भारत कलशात ओतून शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मेरा युवा भारत पोर्टल मोदींच्या हस्ते लाँच करण्यात आला आहे. हे स्मारक आगामी पिढ्यांना नेहमी या ऐतिहासिक आयोजनाची आठवण करून देणार आहे. आज मेरा युवा भारत संघटन म्हणजेच एमवाय भारताचा पाया रचण्यात आला आहे. 21 व्या शतकात राष्ट्रउभारणीसाठी मेरा युवा भारत संघटन अत्यंत मोठी भूमिका बजावणार आहे. भारताचे युवा कशाप्रकारे संघटित होत प्रत्येक लक्ष्य प्राप्त करू शकतात याचे प्रत्यक्ष उदाहरण ‘मेरा माटी मेरा देश’ अभियान आहे. मोठमोठ्या महान संस्कृती कालौघात समाप्त झाल्या, परंतु भारताच्या मातीतील चेतनेमुळे हे राष्ट्र अनादिकाळापासून आजपर्यंत टिकून आहे. हीच ती माती आहे, जी देशाच्या कानाकोपऱ्याला आत्मियता आणि अध्यात्म, सर्वप्रकारे आमच्या आत्म्याशी जोडते असे मोदींनी म्हटले आहे. मेरा युवा भारत संघटन देशाच्या युवाशक्तीचा उद्घोष आहे. हे देशाच्या प्रत्येक युवाला एका मंचावर आणण्याचा मोठा प्लॅटफॉर्म ठरणार आहे. युवांसाठी चालविले जाणारे विविध कार्यक्रम यात सामावले जातील अशी माहिती मोदींनी दिली आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी या यात्रेसंबंधीचे एक डिजिटल प्रदर्शन पाहिले. देशभरातील गावांमधून साडेआठ हजार अमृत कलशांमध्ये माती भरून दिल्लीत आणली गेली आहे. 30 ऑक्टोबरपासून कर्तव्यपथानजीक ठेवण्यात आलेल्या भारत कलशात ही माती जमा करण्यात आली आहे. संस्कृती मंत्रालयानुसार या मोहिमेने एका जन आंदोलनाचे रुप धारण केले असून आतापर्यंत यात दोन लाखाहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन झाले आहे. तर या मोहिमेशी निगडित 4 कोटीहून अधिक सेल्फी देखील याच्या वेबसाइटवर अपलोड झाल्या आहेत. या अभियानादरम्यान ग्रामपंचायत आणि ग्रामसभांच्या स्तरावर आतापर्यंत 2.33 लाखाहून अधिक शिलालेखांची स्थापना करण्यात आली आहे. या शिलालेखांद्वारे स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात आले आहे. बहुतांश शिलालेख अमृत सरोवरांनजीक स्थापन करण्यात आले आहेत. या अभियानाच्या अंतर्गत देशभरात 2.63 लाखाहून अधिक अमृतवाटिकांची देखील निमिर्ती करण्यात आली असून यात सुमारे 24 लाख रोपांची लागवड करण्यात आली आहे. मेरी माटी मेरा देश मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत अमृत कलशांद्वारे गावागावातून माती दिल्लीत आणली गेली आहे. एका मोठ्या कलशात (भारत कलश) याचे जतन करण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश देशाची एकता दाखवून देणे आहे.