अयोध्येत नव्याने उभारण्यात राम मंदिराच्या गर्भगृहात श्री रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली आहे. गर्भगृहातील प्रतिष्ठापना विधीअंतर्गत श्री रामलल्लाची एक मूर्ती बुधवारी श्रीराम जन्मभूमी संकुलात आणण्यात आली होती. त्यानंतर मूर्तीचे पालखीमधून मंदिर परिसरात भ्रमणही पार पडले होते. नगरभ्रमणही झाले. शरयू तटावरून मंदिरापर्यंत महिलांची कलशयात्राही काढण्यात आली होती. दरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात श्री रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली.
बुधवारी सायंकाळी उशिरा रामलल्लाची मूर्ती नव्याने बांधलेल्या मंदिरात आणण्यात आली होती. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली रामलल्लाची ‘श्यामल’ मूर्ती मोबाईल क्रेनच्या साहाय्याने गर्भगृहात ठेवण्यात आली. यावेळी स्वतः योगीराज उपस्थित होते. आज गुरुवारी गर्भगृहात मूर्ती स्थापित केली जाणार आहे.
श्री राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, बुधवारी रात्री राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली. मूर्ती आत आणण्यापूर्वी गर्भगृहात विशेष पूजा करण्यात आली.
मूर्तीच्या आसनाचे पूजन करण्यात आले. दुपारी अडीच वाजता निर्मोही आखाड्याचे महंत दिनेंद्र दास आणि पुरोहित सुनील दास यांनी गर्भगृहात ही पूजा केली. गर्भगृहात प्रतिष्ठापित करावयाच्या मूर्तीचेही शुद्धीकरण झाले. श्री रामलल्लाच्या डोळ्यांवर आता पट्टी बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, ती २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठादिनीच उघडली जाईल.
बहुतांश विधींत प्रतिकृतीचा वापर
श्री रामलल्लाच्या दहा किलो वजनाच्या प्रतिकृतीचा वापर बुधवारच्या नगरभ्रमण, मंदिर संकुल भ्रमण अशा बहुतांश विधींतून करण्यात आला. प्रतिष्ठापित करावयाच्या मूर्तीचे वजन जास्त (२०० किलो) असल्याने या लहान मूर्तीच्या साहाय्यानेच हे विधी पार पाडले गेले.