अयोध्येत 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 55 देशांतील 100 प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. विविध देशांचे भारतातील अनेक राजदूतही सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
विश्व हिंदू फाऊंडेशनचे संस्थापक आणि जागतिक अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्यासाठी देशातील इतर प्रमुख पक्षांसह प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना आणि प्रतिनिधींनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच. डी. देवेगौडा यांना निमंत्रण देण्यात आले आहे. राजद नेते लालूप्रसाद यादव यांच्या भेटीसाठी वेळ मागितला गेला आहे. इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांनी या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. हा कार्यक्रम भाजप आणि संघाचा असल्याचे नमूद करून काँग्रेसचे जयराम रमेश यांनी सहभागास नकार दिला आहे. निमंत्रण मिळाल्याची कबुली समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी दिली असून आपण या सोहळ्याला हजर राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सीपीआयएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी, उद्धव ठाकरे, कपिल सिब्बल आणि ममता बॅनर्जी यांनीही सहभागाला नकार दिला आहे.