Logo
ताज्या बातम्या

राज्यात थंडीचा कडाका वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

पश्चिमेने येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या संयोगामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या (Rain Update) हलक्या सरी सुरु होत्या. दरम्यान आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होईल आणि थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहिल.त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात पावसाच्या हलक्या सरी राज्यातील बहुतांश भागात बुधवारी (दि. 10) पावसाने हजेरी लावली. कोकणात आणि खासकरुन रत्नागिरीमध्ये 0.5 मीमी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि नगरमध्ये 7.8 मीमी पावसाची नोंद झाली. नाशिक आणि पुण्यात 1.6 मीमी पाऊस झाला. या शिवाय मराठवाड्यात आणि औरंगाबादमध्ये 0.5 मीमी पावसाने हजेरी लावली. विदर्भ, अकोल्यात 0.2 तर नागुपरात 0.3 मीमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने दिलेली माहिती अशी की, अरबी समुद्रात तयार झालेली हवेची द्रोणीय रेषा, आग्नेय दिशेने येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात पावसाने हजेरी लावली. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. बुधवारी पावसाचा जोर कमी होत असल्याचे दिसून आले. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढणार दरम्यान आजपासून (दि.11) पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे राज्यातील ढगाळ हवामान कमी होणार असून कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. देशी-विदेशी पर्यटकांची निराशा , पण गुलमर्ग हिमवृष्टीविना यंदाच्या हिवाळ्यात कश्मीर थंडगार पडले आहे. मात्र, स्कीइंगसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमर्गमध्ये अद्यापही हवी तितकी हिमवृष्टी झालेली नाही. त्यामुळे येथे दरवर्षी स्कीइंगसाठी येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची निराशा झाली आहे. गेल्या जानेवारीमध्ये गुलमर्गमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली होती. सर्व परिसरात 5 ते 6 फूट बर्फ साचले होते. मात्र, आता जानेवारी 2024 मध्ये अशा हिमवृष्टीचा अद्याप तरी पत्ता नाही. जागतिक हवामानातील बदलांमुळे हिमवृष्टी न झालेला गुलमर्गचा परिसर, स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटक सगळ्यांचाच हिरमोड झाला आहे.