Logo
ताज्या बातम्या

मराठा आरक्षण संदर्भातील उपसमितीच्या बैठकीतील 'हे' महत्त्वाचे निर्णय

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज (दि.३०) सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीस मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, निवृत्त न्या. संदीप शिंदे, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे, विशेष निमंत्रित मंत्री दिलीप वळसे- पाटील, दीपक केसरकर, समितीचे सदस्य मंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, उदय सामंत, आमदार प्रवीण दरेकर, योगेश कदम, भरत गोगावले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते.मराठा आरक्षण संदर्भातील उपसमितीच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे • न्या संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल उद्याच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला जाईल.निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले, एम. जी. गायकवाड आणि संदीप शिंदे यांची सल्लागार समिती नेमण्याचा निर्णय झाला आहे. ही समिती मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासंदर्भात तसेच सरकारला मागासवर्ग आयोग आणि शासनाला मार्गदर्शन करेल. • सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेण्यास संमती दिल्यामुळे राज्य शासनासमोर चांगली संधी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढाईसाठी आपण स्थापन केलेल्या वरिष्ठ वकिलांच्या टास्क फोर्सची बैठक तातडीने घेण्यात येऊन त्यामध्ये पुढील न्यायालयीन लढाई लढण्याविषयी निश्चित दिशा ठरविण्यात येईल. • सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह याचिकेवर न्यायालयीन कार्यवाही सुरु राहील. मात्र तो पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय फेटाळताना जी निरीक्षणे नोंदविली तिचा अभ्यास मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे हे करतील. त्याचप्रमाणे समाजाच्या मागासलेपणाचे टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स, गोखले इन्स्टीट्यूट यासारख्या इतर नामांकित संस्थांकरवी नव्याने सर्व्हेक्षण करून इम्पेरिकल डेटा तयार करण्यात येईल • मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यात मागील प्रक्रीयेतील झालेल्या ज्या त्रृटी नोंदविल्या गेल्या आहेत, त्याचे निराकरण करण्यात येईल. • मराठवाड्यातल्या जुन्या नोंदी तपासताना उर्दू आणि मोडी भाषेतील कागदपत्रांचे स्कॅन तसेच भाषांतर करून घेण्यात येतील. • सर्व जिल्हाधिकारी प्रांताधिकारी व तहसिलदारांना उद्याच व्हिसीद्धारे सूचना देण्यात येऊन कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आवश्यक ती कागदपत्रांची पडताळणी वेगाने करण्याच्या सूचना देण्यात येतील. • मनोज जरांगे पाटील यांनी चर्चेसाठी पुढे यावे, तसेच आंदोलनावेळी शांततेचा मार्ग सोडू नये. • या संदर्भामध्ये चर्चेसाठी जरांगे यांचे जे प्रतिनिधी येणार असतील त्यांच्याशी समन्वय साधून बैठकीचे आयोजन उद्याच राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्याचे निर्देश जालना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत.