Logo
ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांपैकी जन धन खात्याबाबत मोठी अपडेट! १० कोटी बँक खाती निष्क्रिय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक असलेल्या प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत एकूण ५१ कोटी बँक खात्यांपैकी १० कोटींहून अधिक खाती निष्क्रिय आहेत. यापैकी सुमारे ५ कोटी बँक खाती महिलांच्या नावावर असून, ती निष्क्रिय झाली आहेत. लोकांच्या नॉन-ऑपरेटिव्ह खात्यांमध्ये एकूण १२,७७९ कोटी रुपये जमा आहेत. वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली होती. निष्क्रिय जनधन खात्यांची टक्केवारी बँकिंग क्षेत्रातील एकूण निष्क्रिय खात्यांच्या टक्केवारीसारखीच आहे. १०३.४ कोटी नॉन-ऑपरेटिव्ह जनधन खात्यांपैकी ४९.३ कोटी खाती महिलांची आहेत. नॉन-ऑपरेटिव्ह जनधन खात्यांमधील ठेवी एकूण ठेवींच्या सुमारे ६.१२ टक्के आहेत. बँक खाती निष्क्रिय का झाली? राज्यमंत्री कराड यांनी सांगितले की, खाती निष्क्रिय असण्याची अनेक कारणे आहेत. त्याचा बँक खातेदारांशी थेट संबंध नाही. अनेक महिन्यांपासून बँक खात्याचा कोणताही व्यवहार न केल्यामुळे ही खाती निष्क्रिय झाली असावीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँक खात्यात दोन वर्षांहून अधिक काळ ग्राहकाने व्यवहार केला नसल्यास बचत आणि चालू खाती निष्क्रिय मानली जातात. निष्क्रिय खात्यांची टक्केवारी कमी करण्यासाठी बँका प्रयत्न करत आहेत आणि सरकारकडून नियमितपणे निरीक्षण केले जात असल्याचे कराड यांनी सांगितले होते. खाते पुन्हा सुरू करू शकता ही खाती निष्क्रिय झाली असली तरी सक्रिय खात्यांप्रमाणेच व्याज (Bank Account Interest Rate) मिळत राहणार आहे. खाते सुरू केल्यानंतर तुम्ही त्यातून पुन्हा पैसे काढू शकता. केवायसी करून तुम्ही तुमचे निष्क्रिय खाते सक्रिय करू शकता. मार्च २०१७ मध्ये गैर-ऑपरेटिव्ह खात्यांची टक्केवारी ४० टक्क्यांवरून नोव्हेंबर २०२३ मध्ये २० टक्यांवर आली आहे, असेही मंत्री कराड यांनी सांगितले. जन धन योजनेंतर्गत किती पैसे जमा झाले? जनधन (PMJDY) योजना प्रत्येक कुटुंबाला बँकिंग सुविधा उपलब्ध करून देते. अधिकृत आकडेवारीनुसार, योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण २,०८,६३७.४६ कोटी रुपये जमा झाले आहेत. तर लाभार्थ्यांना ३४७.१ दशलक्ष रुपे (RuPay) कार्ड देखील देण्यात आली आहेत.