Logo
ताज्या बातम्या

राज्यातील साखर कारखान्यांचे यंदाचे एफआरपी धोरण जाहीर

राज्यातील साखर कारखान्यांनी उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीप्रमाणे गाळप हंगाम 2023-24 साठी ऊस दर देण्याचे धोरण राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामध्ये महसूल विभागनिहाय हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत एफआरपी ऊस दर देण्यासाठी आधारभूत धरण्याचा साखर उतारा निश्चित करण्यात आला आहे. साखर उतार्‍यात पुणे व नाशिक महसूल विभागाचा 10.25 टक्के आणि छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर महसूल विभागाचा 9.50 टक्के उतारा आधारभूत धरण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे व नाशिक महसूल विभागाच्या घोषित आधारभूत उतार्‍यानुसार प्रतिटन 3 हजार 150 रुपये आणि इतर महसूल विभागास प्रतिटन 2 हजार 920 रुपये एफआरपीचा दर राहील. हा दर देताना ऊस तोडणी व वाहतूक खर्च वजा जाता शेतकर्‍यांना रक्कम मिळणे अपेक्षित आहे. शासनाच्या आदेशानुसार घोषित आधारभूत साखर उतारा विचारात घेऊन त्या त्या महसूल विभागातील साखर कारखान्यांनी केंद्र सरकारला 2023-24 च्या हंगामासाठी एफआरपीच्या धोरणाबाबत 6 जुलै 2023 रोजी अधिसूचना जारी केली. त्यात निश्चित केलेल्या मूलभूत एफआरपी दरानुसार हंगामाच्या सुरुवातीचा किमान एफआरपी ऊस दर निश्चित करून ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील कलमानुसार साखर कारखान्यांनी कार्यवाही करण्यात यावी, असे 26 डिसेंबरच्या शासन निर्णयात म्हटले आहे. हंगाम 2023-24 करिता बेसिक 10.25 टक्के साखर उतार्‍यासाठी रास्त व किफायतशीर ऊस दर प्रति क्विंटल 315 रुपये आहे. साखर उतारा 10.25 टक्क्यांच्या वरील प्रत्येक 0.1 टक्का उतारा वाढीसाठी प्रिमियम दर 3.07 प्रति क्विंटल आहे; तर साखर उतारा 10.25 टक्क्यांपेक्षा कमी परंतु 9.50 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या प्रकरणी प्रत्येक 0.1 टक्का उतारा घटीसाठी रुपये 3.07 क्विंटल तथापि साखर उतारा 9.50 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यास रास्त व किफायतशीर ऊस दर 291.97 रुपये प्रति क्विंटल आहे. * पुणे व नाशिक महसूल विभागात 10.25 टक्क्यांनुसार प्रतिटन 3 हजार 150 रुपये * राज्यातील अन्य महसूल विभागात 9.50 टक्क्यांस प्रतिटन 2 हजार 920 रुपये