राज्यासह देशातील विविध भागात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, तामिळनाडू, केरळमध्ये आज म्हणजेच सोमवारी पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, लेह, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभाग (IMD) ने वर्तवला आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटची झळ बसल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. त्यामुळे राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.
राज्यात गुलाबी थंडीची चाहूल
राज्यातील कमाल तापमानातही घट होऊ लागल्याने गारठा वाढू लागला आहे. पुढील काही दिवसात किमान तापमानात हळूहळू आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही भागात पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, राज्यातील इतर भागात गारठा वाढताना दिसत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी वाढू लागली आहे.
पर्वतीय भागात बर्फवृष्टी
उत्तर प्रदेशमध्येही तापमानात हळूहळू घट होत आहे. पुढील काही दिवस लखनौमध्ये किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. यासोबतच नोव्हेंबर महिना सुरू होताच धुकेही वाढणार आहे. डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. याशिवाय उत्तराखंडसह जम्मू-काश्मीर, लेह, लडाख आणि हिमाचल प्रदेशातही बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राजस्थानमध्येही हवामान बदलणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यातील काही भागात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यासह देशभरात काही भागात 1 नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. आयएमडीनुसार, 29 ते 30 ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळ, तामिळनाडू, माहे, पुडुचेरीमध्ये पुढील पाच दिवस विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
केरळ आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज आहे. 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी दक्षिण कर्नाटकात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 आणि 30 ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.