ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी येत्या काळात वाढणार असल्याचं बोललं जात आहे. दिशा सालियान प्रकरणी राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटीची (SIT) चौकशी करणार आहे. तसेच, एसआयटीसंदर्भात आजच ऑर्डर येण्याची शक्यता आहे. सुजाता सौनिक आज एसआयटी संदर्भात ऑर्डर काढू शकतात, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे.
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्यानं काही आमदार करत होते. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते.
दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या SIT चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. विरोधकांकडून सातत्यानं आदित्य ठाकरेंवर याप्रकरणी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे याप्रकरणी आदित्य ठाकरेंवर वारंवार थेट आरोप करत होते. त्यामुळे याप्रकरणाला संशियत वळण मिळालेलं आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी थेट एसआटीमार्फत केली जाणार आहे. दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली होती.
CBI नं दिलेली क्लिन चीट
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता. पण सीबीआयनं या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष तपासाअंती काढला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयनं वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आलं होतं. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला, असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंवर सातत्यानं आरोप
दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सतत आरोप केले जात आहेत. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. राणे कुटुंबीयांनी तर या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. परंतु, ठाकरे कुटुंबीयांकडून मात्र या प्रकरणी संयमाची भूमिका घेतली जातेय. आरोप-प्रत्यारोप होत असतानाच साधारणतः वर्षभरापूर्वी या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अशातच आता याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी केली जाणार आहे.
दिशा सालियन केसमध्ये आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, सोबत राऊतही असणार; नारायण राणेंनी केलंय भाकीत
राणे पिता, पुत्र सातत्यानं आदित्य ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप करत आहेत. अशातच सुशांत सिंह आणि दिशा सालियन केसमध्ये आदित्य ठाकरे लवकरच जेलमध्ये जातील आणि त्यांच्यासोबत संजय राऊतही जेलमध्ये जातील असं भाकीत काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलं होतं. नारायण राणे म्हणालेले की, "आता हे ठाकरे गट बैठक घेतात. थोड्या दिवसांनी आदित्य ठाकरे हे बैठकीलासुद्धा नसतील. सुशांत सिंह राजपूत केसमध्ये आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील. त्यांच्यासोबत संजय राऊत देखील असतील. यांच्याकडे असलेले 16 आमदारसुद्धा राहणार नाहीत."
दिशा सालियनवर अत्याचार केला, हत्या केली; आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, नारायण राणेंचे गंभीर आरोप
दिशा सालियान प्रकरणावरुन अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर दिशा सालियान प्रकरणावरुन गंभीर आरोप केले होते. सिंधुदुर्गात बोलताना नारायण राणे म्हणालेले की, सुशांत सिंह आणि दिशा सालियानचं नाव आलं की, आदित्य ठाकरे चवताळतात. दिशा सालियन या एका भारतीय, महाराष्ट्रीय मुलीवर अत्याचार केला आहे, तिची हत्या केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे तिथं उपस्थित होते, सोडणार नाही. आता सत्ता भाजप आणि शिंदे गटाची आहे हे लक्षात ठेवा, असंही नारायण राणे म्हणाले. यापूर्वीही नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर या प्रकरणावरुन आरोप केलेले आहेत.
दिशा सालियान प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करा, आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही केलेली मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल कनाल यांनी दोन महिन्यांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळा राहुल यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणावर भाष्य केलं. ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत डेरेदाखल झालेल्या राहुल कनाल यांनी थेट आदित्य ठाकरेंवर पहिला घाव केला होता. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करुन सखोल चौकशी करण्याची मागणी राहुल कनाल यांनी केली होती. दिशा सालियान प्रकरणाची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची टीका होत होती. त्याला उत्तर देताना कनाल यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते.