Logo
राजकारण

'तिसरी बार मोदी सरकार' : भाजप खासदारांच्‍या घाेषणांनी सभागृह दणाणले

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज (दि.४) सुरूवात झाली. लाेकसभेत कामकाजास प्रारंभ हाेताच भाजप खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी मोदी सरकारने घोषणाबाजी करत तीन राज्यातील विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, सभागृहात गदारोळ झाल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीच्या सत्रातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप खासदारांनी लोकसभेत “तीसरी बार मोदी सरकार” आणि “बार बार मोदी सरकार”चा नारा दिला. सत्ताधारी मोदी सरकारच्या सर्व खासदारांनी सभागृहात उभे राहत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. चार राज्यातील निकाल उत्साहवर्धक कालच चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आले आहेत. हे अतिशय उत्साहवर्धक निकाल आले आहे. देशातील सर्वसामान्य माणसाचे कल्याण आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी समर्पित असलेल्यांसाठी चार राज्यातील निवडणुक निकाल प्रोत्साहन देणारे असल्याचेही पीएम मोदी यांनी संसदेला संबोधित करताना म्हटले आहे. तर देशाची दिशा बदलेल- मोदींचा विरोधकांना सल्ला यावेळी पीएम मोदी म्हणाले, सध्याच्या निवडणूक निकालांच्या आधारे म्हटले तर विरोधी पक्षात बसलेल्या मित्रांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या अधिवेशनात विरोधी पक्षाने पराभवाचा राग काढण्याचे नियोजन करण्याऐवजी या पराभवातून धडा घेत पुढे जावे. गेल्या ९ वर्षातील नकारात्मकतेचा कल सोडून सकारात्मकतेने या अधिवेशनात पुढे गेले तर देशाची दिशा बदलेल, असेही पीएम मोदी म्हणाले.