Logo
ताज्या बातम्या

पाळीव प्राण्यांचे हावभाव पाहून ओळखता येणार त्यांच्या मनातलं; खास 'एआय' टूल करणार मदत

आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी पाळीव प्राणी असतात. यामध्ये श्वान आणि मांजरांचं प्रमाण सर्वाधिक आहे. कित्येक लोक आपल्या कुटुंबातील या सदस्याशी गप्पा मारतात. मात्र, या प्राण्यांना काय म्हणायचं आहे हे समजून घेणं बऱ्याच वेळा आपल्याला शक्य होत नाही. यासाठीच आता 'एआय' तंत्रज्ञान आपली मदत करणार आहे.लिंकन विद्यापीठामध्ये याबाबत संशोधन सुरू आहे. श्वान किंवा मांजराचे चेहऱ्याचे हावभाव पाहून, त्यांना काय म्हणायचं आहे याची माहिती देणारं एक एआय टूल याठिकाणी तयार होत आहे. दि गार्डियनच्या रिपोर्टनुसार, विद्यापीठातील पशु चिकित्सा व्यवहार विषयाचे प्राध्यापक डॅनियल मिल्स यांनी याबाबत माहिती दिली.दि सायन्स डायरेक्ट जर्नलमध्ये यापूर्वीच एक रिसर्च प्रसिद्ध झाला होता. यामध्ये असं म्हटलं होतं, की मांजरी इतर मांजरींशी संवाद साधताना तब्बल 276 प्रकारचे वेगवेगळे हावभाव देतात. या सर्व एक्स्प्रेशनचा अर्थ लावणं कठिण काम आहे. याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माणसांना उद्देशून काही बोलत असल्यास मांजरांचे हावभाव आणखी वेगळे असतात, असं ल्योन महाविद्यालयातील असिस्टंट प्रोफेसर डॉ. ब्रिटनी फ्लॉर्कीविक्झ यांनी म्हटलं आहे.याच रिसर्चच्या आधारे मिल्स आता आपलं संशोधन करत आहेत. प्राण्यांच्या विविध प्रकारच्या हावभावांचा अर्थ लावण्यासाठी ते एआयची मदत घेत आहेत. चेहऱ्याचे हावभाव, कानांची स्थिती, डोळ्यांमधील भाव अशा गोष्टींची नोंद ठेऊन आणि अभ्यास करुन एखाद्या प्राण्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे ओळखणं शक्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.मिल्स आणि त्यांच्या टीमने एक एआय टूल तयार केलं आहे. ऑनलाईन उपलब्ध असणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या व्हिडिओंचं परीक्षण करून, त्यांनी अशी सिस्टीम तयार केली आहे जी श्वान, मांजर आणि घोड्यांचे हावभाव देखील ओळखू शकेल. सामान्य लोकांसोबतच प्राण्यांच्या दवाखान्यांमध्ये याचा भरपूर वापर होऊ शकतो, असं मिल्स यांनी म्हटलं आहे. त्यादृष्टीने ते आपल्या एआय टूलला विकसित करत आहेत.