Logo
राजकारण

आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या स्वागताला उसळला जनसागर; कोपरगावात ऐतिहासिक विजयी मिरवणूक

कोपरगाव, प्रतिनिधी: विधान परिषद उमेदवारीनंतर युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या स्वागतासाठी कोपरगावात जनसागर उसळला. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली भव्य विजयी मिरवणूक तब्बल अकरा वाजेपर्यंत रंगली. अत्याधुनिक जीप, उंट-घोड्यांची सजावट, डीजेचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी, तसेच हजारो युवकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे मिरवणुकीने ऐतिहासिक रूप धारण केले. “धन्यवाद देवाभाऊ, धन्यवाद!” या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. आपल्या भाषणात कोल्हे यांनी सांगितले की, “ही केवळ सुरुवात आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करून विकासाचे मोठे काम करायचे आहे.” ते पुढे म्हणाले, “आमदारकीचा सातबारा जरी माझ्या नावावर असला तरी पोटहिश्यात तुमच्या सर्व कार्यकर्त्यांची नावे आहेत. त्यामुळे तुम्हीही आमदारच आहात.” या विधानाला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला. या मिरवणुकीत ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण, फुलांचा वर्षाव, पेढ्यांचे वाटप, तसेच मोठमोठे बॅनर आणि ‘आता थांबायचं नाही’ अशा संदेशांनी वातावरण भारावून गेले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकांना अभिवादन करत मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आशीर्वादाचा उल्लेख करून सर्व मतदार व कार्यकर्त्यांचे ऋण मान्य केले. मिरवणुकीपूर्वी श्री हनुमान मंदिर व श्री महादेव मंदिर येथे दर्शन घेण्यात आले. या प्रसंगी बिपीनदादा कोल्हे, स्नेहलता कोल्हे, तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपरगावातील ही विजयी मिरवणूक केवळ राजकीय कार्यक्रम न ठरता जनतेच्या उत्स्फूर्त प्रेमाचा आणि विश्वासाचा भव्य उत्सव ठरली.