Logo
राजकारण

ठाकरे गटाच्या याचिकेवर १२ फेब्रुवारीला सुनावणी

आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देणार्‍या ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात दुसर्‍या सुनावणीसाठी 12 फेब्रुवारी 2024 ही नवी तारीख देण्यात आली आहे. याच प्रकारची याचिका शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तिथे सुनावणी 8 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तिथेही दोन्ही बाजूंना उपस्थित राहावे लागणार आहे. राज्यात राज्यसभेच्या 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर ही सुनावणी महत्त्वाची आहे. दरम्यान, यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणीसाठी 5 फेब्रुवारी ही तारीख दिली होती. मात्र 5 फेब्रुवारीला न्यायालयाच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नसल्याने सुनावणी झाली नव्हती. 5 फेब्रुवारीला सुनावणी न झाल्याने ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती केली होती. राज्यसभा निवडणुकीत शिंदे गट ठाकरे गटाच्या आमदारांवर व्हिपचा प्रयोग करू शकतो, हा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सुनावणी लवकर घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर सुनावणीची नवी संभाव्य तारीख 12 फेब्रुवारी 2024 आज न्यायालयाने आपल्या वेळापत्रकात दिली आहे. तत्पूर्वी 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी झाली होती. या सुनावणीत न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांना नोटीस बजावली होती. विधानसभाध्यक्षांना मात्र ठाकरे गटाने प्रतिवादी केलेले नसल्याने न्यायालयाने त्यांना नोटीस दिली नव्हती.