Logo
ताज्या बातम्या

कोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे, हातकणंगलेत राजू शेट्टींशी चर्चा, संजय राऊतांची माहिती

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा वादाच्या जागांवर तोडगा निघाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शरद पवार यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नेहरू सेंटरला झालेल्या बैठकीत जागावाटपाचा फायनल कागद तयार झाला आहे. कोल्हापूरमध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती काँग्रेसचे उमेदवार असतील. कोल्हापूरच्या बदल्यात आम्ही सांगलीची जागा घेतली आहे. सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे दोन दिवसांत सांगलीत प्रचाराला जातील, असे राऊत म्हणाले. रामटेकची जागा काँग्रेसला देण्याचे निश्चित झाले आहे. यामुळे या जागेबाबतची चर्चा इथेच संपली आहे. हातकणंगलेची जागा आमच्याकडे आहे. इथे राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरु आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी काँग्रेस पक्ष चर्चा करत आहेत. इतर काही नेतेही त्यांच्याशी चर्चा करत आहेत. प्रकाश आंबेडकर काल चर्चेला आले हे सकारात्मक आहे, असे राऊत यांनी सांगितले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नुकतीच मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपण महाविकास आघाडीत येणार नाही, मात्र भाजप विरोधातील मतांची विभागणी टाळण्यासाठी आपल्याला शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याबदल्यात शिवसेनेच्या राज्यभरातील उमेदवारांना पाठिंबा देईल, अशी भूमिकाही स्पष्ट केली. याबाबत दोन दिवसांत चर्चा करून आपली भूमिका सांगू, असे ठाकरे यांनी शेट्टी यांना सांगितले आहे.