उद्धव ठाकरे गट राज्यात लोकसभेच्या कोल्हापूर, इचलकरंजीसह 20 जागा लढविणार आहे. रामटेक आणि अमरावती या जागांवरील हक्क मात्र सोडणार आहे. हा गट मुंबईत चार जागा लढविणार आहे. त्यांनी या सर्व मतदारसंघांतील उमेदवारही जवळपास निश्चित केले आहेत.
उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत आघाडीमार्फत प्रथमच लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. अशा स्थितीत कोणत्या जागा लढवायच्या, याचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यात 20 जागांवर दावा करण्याचे उद्धव ठाकरे यांनी निश्चित केले आहे. मुंबईतल्या सहापैकी चार जागांवर ठाकरे गटाने दावा केला आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे आणि कल्याण या दोन जागा, तर कोकणात अनंत गीते (रायगड) आणि विनायक राऊत (सिंधुदुर्ग-रत्नागिरी) या जागा ठाकरे गट लढविणार आहे.
मराठवाड्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना या जागांवर उद्धव ठाकरे गटाची तयारी सुरू आहे.
विदर्भात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चार जागा लढवून शिवसेनेने तीन जागा जिंकल्या होत्या. यावेळी बुलडाणा आणि वाशिम या जागा उद्धव ठाकरे गट लढेल; तर रामटेक आणि अमरावतीची जागा काँग्रेससाठी सोडण्याचे या गटाने ठरविले आहे.
मावळ, नाशिक, शिर्डीवरही दावा
पश्चिम महाराष्ट्रात मावळ, कोल्हापूर, इचलकरंजी या जागा, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, शिर्डी (शंकरराव गडाख) या जागा उद्धव ठाकरे गट लढणार आहे.