Logo
राजकारण

ईडीची कारवाई झालेले ८५ टक्के नेते विरोधी पक्षातले : शरद पवार

ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांना एकप्रकारे धमकी दिली जात आहे. ईडीने ज्यांच्यावर कारवाई केली त्यात एकही भाजपचा नेता नाही. कारवाई झालेले ८५ टक्के नेते विरोधी पक्षातील आहेत. ईडीने चौकशी केलेल्या ५ हजार ९०६ केसेसपैकी केवळ २५ प्रकरणांचाच निर्णय झाला, असे सांगत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. आज (दि.११) पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, अजित पवार गटातील निलेश लंके यांच्या पुन्हा प्रवेशाच्या चर्चेबद्दल काही अर्थ नाही. त्याबाबत मला काही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. “काँग्रेसच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांवर कधीही चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली नाही. तेव्हा स्वत:च्या नेत्यांवरही कारवाया झाल्या. मात्र, सध्या ईडीने ज्यांच्यावर कारवाई केली त्यात एकही भाजपचा नेता नाही. निवडणुकीच्या तोंडावर ईडी, सीबीआयचा गैरवापर सुरू आहे. ईडीचा वापर करून निवडणुकीआधी विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेत्यांवर खोटे आरोप करून त्रास दिला जातो. ईडीची कारवाई विरोधकांवरच कशी होते, असा सवाल करत शरद पवार यांनी रोहीत पवारांवरील ईडीची कारवाई अयोग्य असल्याचे म्हटले आहे. ‘ईडीच्या कारवाईतून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न’ कर्नाटकामध्ये एका ज्येष्ठ नेत्याला अटक केली. पण कोर्टाने निर्दोष सोडले. याचा अर्थ ईडीचा गैरवापर सातत्याने केला जात आहे. महाराष्ट्रात हे सुरू झाले आहे. यापूर्वी अनिल देशमुखांवर कारवाई केली. संजय राऊत यांच्याबाबतही हेच घडले. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम केले जात आहे. रोहित पवार यांच्या संस्थेची जप्ती व कारवाई हा दहशतीचा भाग होता, असा गंभीर आरोप शरद पवारांनी केला आहे. सरकारने कारखाना विकायला काढला. सर्वाधिक निविदा असलेल्या संस्थेला मिळाला. सक्रिय कार्यकर्त्याला दाबण्याचे काम केले जात आहे. सीबीआय व ईडीचा प्रभाव निवडणुकीवर पाडण्याचा प्रकार सुरु आहे. सतरा वर्षाचा काळ गेल्यानंतर ५९०६ ईडीच्या केसेस नोंदवल्या. यातील चौकशी करून २५ रद्द करण्यात आल्या. ४० टक्के तक्रारीवर कारवाई झाली. ईडीचे बजेट ४०४ कोटी आहे, असेही त्यांनी सांगितले. भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई का नाही? भाजप सत्तेवर आल्यापासून १४७ नेत्यांची चौकशी केली. यात ८५ टक्के नेते विरोधी (११५) पक्षाचे होते. यात काँग्रेस २४, एनसीबी ११, शिवसेना ८, समाजवादी पक्षाच्या ५ नेत्यांचा समावेश होता. यात कारवाई केलेल्यांमध्ये एकही भाजपचा नाही, असाही दावा त्यांनी केला. ‘ईडी भाजपचा सहकारी पक्ष’ आम्ही निवडणुकीच्या कार्यक्रमाची वाट बघतोय. निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्यासाठी दबाव आणला जातो. निवडणूक आयोगाच्या निवड प्रक्रियेतून सरन्यायाधिशांना काढल्याने निवड निपक्षपाती होईल, याबाबत शंका आहे, असेही पवार यांनी सांगितले. निलेश लंके शरद पवार गटात परतणार का? निलेश लंके शरद पवार गटात परतणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यावर पवारांनी खुलासा केला आहे. निलेश लंके यांच्याबाबत तुमच्याकडूनच कळते. महादेव जानकर यांची दोन दिवसांत भेट होईल, त्यानंतर त्यांचा प्रस्ताव काय‌ येईल ते पाहू. आंबेडकरांचे एक पत्र आले आहे, त्यात त्यांना काही गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यांच्या हेतूबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्व मतदारसंघात उमेदवार उभे केल्यास अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत होईल, असा दावाही त्यांनी केला.