Logo
ताज्या बातम्या

खासगी विमान, हेलिकॉप्टरची मागणी ४० टक्के वाढणार? निवडणूक प्रचारासाठी प्राधान्य

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून दौऱ्यांसाठी खासगी विमान, हेलिकॉप्टरचा बराच वापर केला जातो. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा त्यात ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. कोणतीही निवडणूक म्हटली की, राजकीय नेत्यांच्या सभांचा धुरळा उडतो. कमीत कमी वेळेत अधिकाधिक सभा तसेच प्रचाराला हजेरी लावण्यावर नेत्यांचा भर असतो. त्यासाठी वेगवान वाहतुकीचा पर्याय म्हणून खासगी विमान आणि हेलिकॉप्टरला मागणी वाढते. यंदाच्या निवडणुकीसाठी गतवेळच्या तुलनेत हेलिकॉप्टरची उपलब्धता वाढेल, असे क्लब वन एअरचे सीईओ राजन मेहरा यांनी सांगितले. देशात ४५० खासगी विमाने डिसेंबर २०२३ पर्यंत देशात ११२ खासगी विमान वाहतूक कंपन्या कार्यरत होत्या. त्यांच्याकडे एकूण ४५० विमाने आहेत. त्यापैकी निम्म्या कंपन्यांकडे १ ते २ विमाने आहेत. मागणी का वाढणार? : यंदाच्या निवडणुकीमध्ये नेत्यांकडून निमशहरी तसेच ग्रामीण भागात प्रचारावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी हेलिकॉप्टर हा सोपा आणि वेगवान पर्याय आहे. त्यामुळे पक्षांकडून त्याला प्राधान्य दिले जाते. किती दर असतो? खासगी विमान ४.५ ते ५ लाख हेलिकॉप्टर १.५ लाख (प्रतितास) आतापर्यंत झालेल्या नोंदणीनुसार, हेलिकॉप्टर व खासगी विमानांसाठी सर्वाधिक मागणी भाजपकडून करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आसन क्षमता किती? खासगी विमाने ३ ते ३७ हेलिकॉप्टर १० पेक्षा कमी