राज्यात सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी पोलीस भरतीची संधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सरकारचे लक्ष याकडे वेधण्यासाठी वयोमर्यादा अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदान येथे एक दिवसीय आंदोलनही केलं.
पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथील करण्याची मागणी
मार्च 2023 मध्ये सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या अध्यादेशाचा आधार घेत. या उमेदवारांनी ही मागणी केली आहे. राज्यभरात असे 10 हजारहून अधिक उमेदवार असल्याचे या मागणीपत्र नमूद करण्यात आलं आहे. कोरोना काळात भरती रखडल्याने पोलीस भरतीसाठी इच्छुक अनेक उमेदवार अडचणीत सापडले असून या उमेदवारांनी वयोमर्यादेत सूट मिळत भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं उमेदवारांचं आंदोलन
सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या अध्यादेशानुसार कोरोना,सदोष मागणीपत्रे किंवा मागणीपत्रे न पाठविणे यामुळे अनेक पदांच्या भरतीसाठी पुरेशा जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नाही, यामुळे भरती प्रक्रिया रखडली होती. परिणामी वयोमर्यादा ओलांडल्याने अनेक उमेदवारांनी परीक्षेला बसण्याच्या संधी गमावल्या आहेत.
वयोमर्यादेची अट शिपाई भरतीसाठीही लागू करण्याची मागणी
वयोमर्यादेची अट खुल्या आणि आरक्षित प्रवर्गासाठी दोन ते पाच वर्षांनी शिथिल करण्यात आली होती. या अध्यादेशाचा आधार घेत पोलीस शिपाई भरतीसाठीही हा नियम लागू करण्याची मागणी या उमेदवारांमधून होत आहे. त्याच बरोबर मार्च 2024 पर्यंत वयोमर्यादेची अट शिथील करावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. याबाबत या उमेदवारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे.
वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना एक संधी देण्याची मागणी
पोलिस भरतीची जाहिरात 31 डिसेंबरपूर्वी निघणे अपेक्षित असताना,ही जाहिरात फेब्रुवारीत काढण्यात आली. या तीन महिन्यात अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली. जाहिरात वेळेत प्रसिद्ध झाली असता सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना या निर्णयाचा लाभ झाला असता. त्यामुळे या 2022-23 च्या भरती प्रक्रियेसाठी 2021-22 नुसार वयगणना करावी किंवा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना एक संधी द्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली जात आहे.