रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुकेश अंबानी यांना २७ ऑक्टोबर रोजी ई-मेलवरून जीवे मारण्याची धमकी आली आहे. जर २० कोटी रुपये न दिल्यास गोळ्या घालून ठार मारु, अशी धमकी त्यांना ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबईच्या गावदेवी पोलिस स्थानकात आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
२७ ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांच्या कार्यकारी सहाय्यकाने सुरक्षा हेडना सांगितले की त्यांना रात्री ८.५१ वाजता एक ई-मेल आला. मेल पाठवणार्याचे नाव शादाब खान आहे. ‘तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला ठार मारू. आमच्याकडे भारतातील बेस्ट शूटर्स आहेत.’ असे ई-मेलमध्ये नमूद केले आहे.
या प्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांनी शादाब खान नावाच्या व्यक्तीविरुद्ध आयपीसी कलम ३८७ (खंडणीसाठी धमकी देणे किंवा गंभीर दुखापत) आणि ५०६ पार्ट २ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. याआधीही मुकेश अंबानी यांना धमकी आली होती.