Logo
ताज्या बातम्या

तानाजी मालुसरे यांच्या स्मारकासाठी 10 कोटी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या सैन्‍यातील सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.मौजे उमरठ (जि. रायगड) येथील स्मारकासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.५) केली. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे. मौजे उमरठ (जि. रायगड) येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ व परिसराच्या सुशोभीकरण कामाचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला. उमरठ येथे आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे आदी उपस्थित होते. …त्यांनी जगापुढे ठेवलेला आदर्श कधीही विसरू शकणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी X पोस्टमध्ये म्‍हटलं आहे की “छत्रपती शिवाजी महाराजांना #तानाजी मालुसरे यांनी दिलेली साथ आणि स्वामी निष्ठेचा जगापुढे ठेवलेला आदर्श हा कधीही विसरू शकणार नाही. तानाजी मालुसरे यांचे अतिशय भव्य दिव्य असे स्मारक करण्यात येईल.” रायगड जिल्ह्यातील मौजे उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ व परिसराचे सुशोभीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये शिवकालीन जननी कुंभळाजाई मंदिराचे सुशोभीकरण, समाधी प्रवेशद्वाराजवळच्या कमानीचे बांधकाम, बुरुजाचे बांधकाम, प्रसाधनगृहे, अंतर्गत रस्ते, काँक्रिट गटार, कंपाउंड वॉलचे बांधकाम आदी कामांचा समावेश आहे. यासाठी सुमारे चार कोटी पंधरा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.