Logo
ताज्या बातम्या

ऐन दिवाळीत वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीचे सावट; कापड उत्पादनामध्ये ४० टक्के घट

जगभरातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मंदावलेली निर्यात, देशांतर्गत घटलेली मागणी, मंदीचे वातावरण यामुळे ‘राज्याचे मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योगांवर विपरीत परिणाम झाला आहे. यंत्रमागावरील कापड उत्पादनामध्ये ३५ ते ४० टक्के घट झाली आहे. तयार कपडे बनवणारे (गारमेंट) उद्योग बंद पडण्याचे प्रमाण वाढत असून, विकलेल्या कापडाचे पैसे मिळण्यास चार-चार महिने विलंब होत असल्याने उत्पादक चिंताग्रस्त आहेत.इचलकरंजीचा वस्त्रोद्योग शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करत आहे. १९०४ साली पहिला यंत्रमाग सुरू झालेल्या इचलकरंजी शहरात साधे माग झपाटय़ाने वाढत जाऊन संख्या लाखावर गेली. नवसहस्त्रकांपासून सुल्झर, रेपियर एअरजेट असे धोटाविरहित (शटललेस) अत्याधुनिक मागाचे युग अवतरले. साध्या यंत्रमागाची किंमत २५-५० हजारांच्या आसपास असताना नव्याने येणारे शटललेस लूम ४० ते ५ लाख रुपये किमतीचे आहेत. इचलकरंजी हे शटललेस मागाचे ( १४,५०० संख्या ) देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे केंद्र बनले आहे. आधुनिकीकरणाचा मार्ग चोखाळलेल्या इचलकरंजीतील या वस्त्र उद्योगाला मंदीने जर्जर केले आहे.