Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : डीकेटीईचा राज्य सरकारशी सामंजस्य करार

महाराष्ट्र शासन टेक्स्टाईल विभाग व डीकेटीई यांच्यात सामंजस्य करारप्रसंगी वीरेंद्र सिंग, डॉ. सपना आवाडे, रवी आवाडे, प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, प्रा. डॉ. यू. जे. पाटील.येथील डीकेटीईचे टेक्सटाईल अॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र शासनाचा वस्त्रोद्योग विभाग यांच्यात वस्त्रोद्योग व्यवसायास चालना देण्यासाठी आणि विद्यार्थी कल्याणासाठी सामंजस्य करार केला. मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये झालेल्या महाराष्ट्र शासन आणि कॉन्फीडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्यामार्फत आयोजित ‘टेक्सफ्युचर २०२३’ परिषदेत डीकेटीईचे पदाधिकारी व महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे पदाधिकारी यांच्यात कराराचे आदानप्रदान झाले. या परिषदेमध्ये डीकेटीईच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. वस्त्रोद्योग सचिव वीरेंद्र सिंग व डीकेटीईच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे, विश्वस्त रवी आवाडे, प्रभारी संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील यांच्यामध्ये कराराचे आदानप्रदान झाले. केंद्राच्या वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जर्दोष, विधानसभा सभापती राहुल नार्वेकर, डीकेटीईचे उपाध्यक्ष प्रकाश आवाडे आदी उपस्थित होते. करार पाच वर्षांसाठी आहे. करारासाठी डीकेटीई अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. करारासाठी प्रा. डॉ. व्ही. के. ढंगे, डॉ. पी. बी. मलकाने यांनी समन्वयकाचे काम पाहिले. ------------- वस्त्रोद्योग वाढीसाठी होणार मार्गदर्शन करारामुळे डीकेटीईमधील उपलब्ध अद्ययावत टेक्नॉलॉजीचा लाभ वस्त्रोउद्योगांना होणार असून येथील प्राध्यापकांद्वारे राज्यातील वस्त्रोद्योग वाढीसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे. यामुळे राज्यातील वस्त्रोद्योग कार्याचा विस्तार व गुणवत्ता वाढीसाठी फायदा होणार आहे. यानिमित्त ताज हॉटेल मुंबई येथे प्रदर्शानामध्ये डीकेटीईच्या स्टॉलचा सहभाग होता.