राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी कोल्हापूर दौर्यावर येत असून, या दौर्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा व गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतून उमेदवार निश्चित करण्याबाबत ते महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करतील, अशी शक्यता आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराज यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांची त्यांच्या नावाला पसंतीही आहे. महाराजांनी आघाडीतील कोणत्या पक्षामार्फत निवडणूक लढवावी, हे त्यांनीच ठरवावे. त्याबाबत आघाडीतील कोणताही राजकीय पक्ष कोणतीही भूमिका घेणार नाही, असेही ठरल्याचे समजते. मात्र, शाहू महाराज यांनी याबाबत अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.
या दौर्यात शाहू महाराज व शरद पवार हे कॉ. गोविंद पानसरे स्मारक लोकार्पणाच्या कार्यक्रमात एका व्यासपीठावर असतील तसेच सायंकाळी भोजन समारंभाला ते एकत्र येण्याची शक्यता आहे. यावेळी राजकीय चर्चा होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ‘हातकणंगले’तून राजू शेट्टी यांच्या नावाची चर्चा असली, तरी त्यांची व शरद पवार यांची भेट होणार का, हे उद्याच निश्चित होईल. कदाचित शेट्टी हे शिवसेनेच्या कोट्यातून महाविकास आघाडीपुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तसे असेल तर त्यांची व पवार यांची भेट होण्याची शक्यता कमी आहे.