महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सोहळा गुरुवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे रंगणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या आकर्षक समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित मुलाखत हे या वर्षीच्या सोहळ्याचे नेहमीप्रमाणे वेगळे आकर्षण असणार आहे. उद्योजिका ईशा अंबानी आणि अभिनेता रणबीर कपूर हेही या सोहळ्यात सहभागी होत आहेत.
‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’च्या इतिहासात पहिल्यांदा हा समारंभ, भारताचे प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या गेटवे ऑफ इंडिया येथे होणार आहे. या समारंभाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील अनेक मंत्रिगण, वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकारी, उद्योजक, डॉक्टर्स, वकील यांची उपस्थिती असेल. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांची एकाच व्यासपीठावर एकत्रित मुलाखत पहिल्यांदा होत आहे. या मुलाखतीतून सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, भविष्यात कोणते पक्ष, कशा पद्धतीने एकत्र येतील, यावरही सवाल-जबाब होतील. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मैत्रीची गोष्टही या मुलाखतीतून उलगडली जाईल.
दिनांक - १५ फेब्रुवारी (गुरुवार)
वेळ - सायं. ५:३०
स्थळ - गेटवे ऑफ इंडिया