Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :सायझिंग उद्योग बेमुदत बंद आंदोलन सुरू

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अन्यायी कारवाईविरोधात तसेच बंद करण्यात आलेल्या चार सायझिंगना उद्योग सुरू करण्यासाठी पूर्ववत परवानगी देण्यात येत नसल्याच्या कारणावरून सायझिंग उद्योग शुक्रवारपासून बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. बंद आंदोलनामुळे सुमारे 150 हून अधिक साध्या व एलपीसी सायझिंगमधील कामकाज ठप्प होते. त्यामुळे दररोज होणारी सुमारे 25 ते 30 कोटींची उलाढाल थंडावली आहे. आंदोलन सुरूच राहिल्यास त्याचा मोठा परिणाम यंत्रमाग व्यवसायावर होऊन यंत्रमागांचा खडखडाट थांबणार आहे. दंड न भरल्याच्या व कोणतेही कारण न देता प्रदूषण होत असल्याच्या कारणावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील आठ सायझिंगना नोटिसा बजावल्या होत्या तर मंडळाच्या आदेशाने इचलकरंजीसह कबनूर येथील चार सायझिंग उद्योगांचे वीज कनेक्शन महावितरणने तोडले आहे. हे सायझिंग उद्योग पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी तसेच अन्यायी कारवाई थांबवावी, या मागणीसाठी सायझिंगधारकांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा तसेच अन्य लोकप्रतिनिधींनाही भेटून निवेदन दिले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय आयुक्तांचीही भेट घेऊन मागण्या मांडल्या होत्या. मात्र उद्योग पूर्ववत सुरू करण्याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे सायझिंगधारकांनी आज सकाळपासून बेमुदत उद्योग बंद आंदोलन सुरू केले. शहरातील पीएलसीचे 70 हून अधिक सायझिंग तर 80 हून अधिक साधे सायझिंग बंद ठेवण्यात आले आहेत. उद्योगासाठी आवश्यक बिमे सायझिंगच्या ठिकाणी तयार होतात. आंदोलनामुळे काही यंत्रमागधारकांना आज बिमे मिळाली नाहीत. सायझिंग आणखीन काही दिवस बंद राहिल्यास बिमे न मिळाल्याने शहरातील यंत्रमागाचा खडखडाट थांबणार आहे. 4500 कामगार कामापासून वंचित शहरातील 150 हून अधिक सायझिंगमध्ये सुमारे 4500 हून अधिक कामगार काम करतात. अनेक कामगार नेहमीप्रमाणे कामावर आले होते. मात्र आंदोलनामुळे त्यांना परत फिरावे लागले. त्यामुळे ते आज कामापासून वंचित राहिले तर आंदोलनामुळे बिमांची, सुताची वाहतूक करणार्‍या वाहनांवरही आंदोलनाचा परिणाम जाणवला.