आगामी दोन महिन्यांसाठी रेपो दरामध्ये कोणतेही परिवर्तन न करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्यामुळे इतर बँकांकडूनही कर्जांवरील व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता नाही. कर्जधारकांच्या मासिक हप्ता यामुळे पूर्वीइतकाच राहणार आहे. हा त्यांना मोठाच दिलासा मानण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी पार पडली. सर्व संचालकांनी रेपो दर आहे त्याच प्रमाणात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दराचे प्रमाण 6.50 टक्के इतकेच राहणार आहे. सलग सहा वेळा या दरात कोणतेही परिवर्तन करण्यात आलेले नाही. महागाईचा वाढदर 4 टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यासाठी बँक प्रयत्न करीत असून भविष्यकाळात महागाई वाढीवर नियंत्रण मिळविण्यात यश येईल, असा विश्वास बँकेच्या सर्व संचालकांनी व्यक्त केला आहे.
अर्थव्यवस्था समाधानकारक
अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या समाधानकारक आहे. आर्थिक क्षेत्रात वेगाने हालचाली होती आहेत. खरेदीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात स्थूल राष्ट्रीय उत्पन्न 7.3 टक्क्यांनी वाढणार असल्याचे भाकित बँकेने केले आहे. गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षातही विकासदर 7 टक्के राहील. महागाईही नियंत्रणा राहील, असे प्रतिपादन करण्यात आले आहे.
अनेक घटक अनुकूल
अर्थव्यवस्थेची वेगाने वाढ होण्यासाठी अनेक घटक सध्या अनुकूल आहेत. रबी पीकपेरणीत झालेली वाढ, उत्पादनक्षेत्राला होत असलेला सातत्यपूर्ण नफा, सेवा क्षेत्राची समाधानकारक वाढ, इत्यादी घटक अनुकूल आहेत. त्यांचा सुपरिणाम आगामी आर्थिक वर्षातील आर्थिक घडामोडींवर होणार असल्याने आगामी 2024-2025 या आर्थिक वर्षातही विकास दर 7 टक्के राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा दर जगातील सर्वाधिक असेल, अशी माहितीही देण्यात आली.
महागाई दर 5.4 टक्के राहणार
अर्थव्यवस्थेशी आणि बाजाराशी संबंधित विविध घटक लक्षात घेता महागाईचा दर आगामी आर्थित वर्षात 5.4 टक्के इतका राहील असेही भाकित बँकेने केले आहे. यंदा मान्सूनही सरासरीइतका होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून अन्न धान्यांचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. आगामी आर्थिक वर्षाच्या प्रथम आणि द्वितीय तिमाहींमध्ये महागाईवाढ दर 4 टक्के आणि 5 टक्के राहणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली.
अचानक वाढीमुळे चिंता
अलिकडच्या काळात वस्तूंचे, विशेषत: जीवनावश्यक वस्तूंचे दर अचानक वाढतात असा अनुभव आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात बाधा येत आहे. असे होणे हे बँकेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. बँकेने यावर बारकाईने दृष्टी ठेवली असून हे अचानक बसणारे धक्के थोपविण्यासाठी उपाय योजना करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अन्य देशांमध्ये घडणाऱ्या घडामोडीदेखील जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेवर परिणाम करतात. जागतिक पुरवठा साखळ्या तुटण्याची शक्यता असते. या सर्वांना तोंड देताना सर्वसामान्य नागरीकाला कमीत कमी त्रास व्हावा, असा प्रयत्न आहे, असे वक्तव्य शक्तीकांत दास यांनी केले आहे.
उद्योगक्षेत्राकडून स्वागत
रेपो दर आहे त्याच पातळीवर ठेवण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचे स्वागत उद्योग जगताने केले आहे. या निर्णयामुळे व्याजदर, विशेषत: गृहकर्जांवरचे व्याजदर स्थिर राहतील. यामुळे कर्ज काढून घर घेण्याऱ्यांच्या प्रमाणात वाढ होईल. याचा लाभ गृहनिर्माण उद्योगाला होईल, अशी आशा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.