आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सहजपणे लागोपाठ तिसर्यांदा सत्तेवर येईल, असा देशाचा मूड दर्शविणारा अंदाज इंडिया टुडे – सी वोटर्सच्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आल आहे. मात्र महाराष्ट्रात महायुतीपेक्षा मविआचे पारडे जड असल्याचे चित्र समोर आले आहे.
सध्या भाजपचे 303 खासदार आहेत. त्यात एकाने वाढ होऊन भाजप स्वबळावर 304 पर्यंत मजल मारेल, अशी शक्यता या सर्वेक्षणात वर्तविण्यात आली आहे. देशातील इतर राज्यांमध्ये उत्तर प्रदेशात 80 पैकी 62 जागा भाजपला मिळतील; तर राजधानी दिल्लीत 7 पैकी 7 जागांवर कमळ फुलेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे कडवे आव्हान महायुतीपुढे असेल. विरोधकांच्या महाविकास आघाडीला 48 पैकी 26 जागा मिळू शकतील. भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीला 22 जागांवर समाधान मानावे लागेल, असा इशारा देणारा अंदाजही या सर्वेक्षणातून समोर आला आहे. महायुतीला 40.5 टक्के, मविआला 44.5 टक्के तर इतरांना 15 टक्के मते मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाविकास आघाडीला 26 जागा मिळतील आणि त्यामध्ये काँग्रेसला 12, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना एकत्रितपणे 14 जागा मिळण्याची शक्यता आहे.
2019 मध्ये एनडीएला मिळाल्या होत्या 41 जागा
देशात उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी 41 जागा एनडीएने जिंकल्या होत्या. यामध्ये भाजपने 22 जागा, तर शिवसेनेने 19 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये राष्ट्रवादीला 4 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. एमआयएमने संभाजीनगरच्या एका जागेवर विजय मिळवला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडून प्रत्येकी दोन गट निर्माण झाले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट भाजपसोबत महायुतीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत आहे. या परिस्थितीत आजघडीला लोकसभेच्या निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीचे पारडे जड दिसत आहे.
एनडीएला एकून 335 जागा
केंद्रात लागोपाठ तिसर्यांदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सत्तेत येईल, अशी शक्यता सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आली आहे. यात एनडीएला 335 जागा मिळतील. तसेच विरोधकांच्या इंडिया आघाडीला 166 आणि अन्य पक्षांना 42 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.