चांद्रभूमीवर अचूक लँडिंग करण्यात जपानच्या ‘जाक्सा’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘स्लिम’ यानाला यश आले; पण त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. हे यान चंद्रावरील अशा ठिकाणी उतरले आहे, जिथे सध्या अंधार आहे. यानाचे सोलर पॅनेल काम करीत नाहीत आणि त्यामुळे वीजनिर्मितीही ठप्प आहे. त्यामुळेच जपानचे हे ‘स्लिम’ मून लँडर चांद्रभूमीवर उतरताच सुमारे तीन तासांनी त्याला स्विच ऑफ करण्यात आले होते. आता ‘जाक्सा’ने ‘स्लिम’ला वाचवण्यासाठी भारताच्या ‘चांद्रयान-2’ या क्रॅश लँडिंग झालेल्या यानाची मदत घेणे सुरू केले आहे.
जपानने ‘स्लिम’ यानाचे पहिले छायाचित्रही जारी केले आहे. हे लँडर आपल्या लक्ष्यापासून 55 मीटर अंतरावर उतरले असल्याचे जपानने म्हटले आहे. जपानला या संकटातून बाहेर काढण्यासाठी भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ पुढे आली आहे. ‘नासा’ला हरवलेले उपग्रह शोधण्यासाठी मदत करणारे वैज्ञानिक स्कॉट टिली यांनी ‘जाक्सा’च्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘जाक्सा’ आणि ‘इस्रो’दरम्यान ‘स्लिम’बाबत सहयोग सुरू असल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत.
‘जाक्सा’ भारताच्या ‘चांद्रयान-2’च्या उच्च क्वॉलिटीच्या प्रतिमांचा वापर करीत आहे, जेणेकरून स्लिम मोहिमेला वाचवता येईल. याच प्रतिमांच्या मदतीने ‘जाक्सा’ला स्लिम यान चंद्रावर अचूक उतरण्यासाठी मदत मिळाली होती. ‘स्लिम’ला कुठे उतरवायचे त्याचा निर्णयही ‘जाक्सा’ने ‘चांद्रयान-2’ च्या प्रतिमांचा वापर करूनच घेतला होता. सध्या भारत आणि जपानदरम्यान लुनार पोलर मिशन ‘लुपेक्स’ सुरू आहे.