आमचे सरकार हे जनतेचे सरकार आहे. सव्वा लाख लोक सुट्ट्या न घेता रात्रंदिवस मागासवर्ग आयोगाचे सर्वेक्षणाचे काम करत आहेत. मराठा समाजाने आता सहकार्य केले पाहिजे. जरांगे यांनी समंजसपणा दाखवून आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गावातून केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तेश्वर यात्रेनिमित्त दोन दिवसांच्या मुक्कामी दौर्यावर आहेत. त्यांचे मूळ गाव असलेल्या दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे ते आले आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांना जरांगे यांच्या आंदोलनाबाबत थेट प्रश्न विचारले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, याचीदेखील आम्ही काळजी घेणार आहोत. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येताच आम्ही मराठ्यांना टिकणारे कायमस्वरूपी आरक्षण देणार आहोत. इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. मराठा समाज मागास कसा आहे, हे सिद्ध करण्याचे काम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या होत्या, त्या दूर करण्याचे काम सुरू झाले आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सरकारला सादर होईल. त्यानंतर विशेष अधिवेशन होईल. त्यामध्ये मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाईल. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी समंजसपणाची भूमिका घ्यावी. सरकार आंदोलनकर्त्यांच्या बाजूने आहे, तसेच आरक्षण देणार आहे याचा विचार करून त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना केले.