सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटीशनवर बुधवारी सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश बी. आर. गवई यांच्या खंडपीठासमोर इन चेंबर सुनावणी पार पडली. मात्र, या सुनावणीत काय झाले, याची माहिती रात्रीपर्यंत उपलब्ध झाली नाही. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतचा निकाल गुरुवारी किंवा पुढच्या आठवड्यात दिला जाऊ शकतो.
मराठा आरक्षणप्रकरणी दिलेल्या निकालावर फेरविचार व्हावा आणि पुन्हा एकदा बाजू ऐकून घेतली जावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात हे क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केले आहे. याचिकेवरील पहिली सुनावणी 6 डिसेंबरला झाली होती. त्यानंतर दुसरी सुनावणी बुधवारी झाली. बुधवारी झालेली ही सुनावणी इन चेंबर म्हणजेच न्यायमूर्तींच्या दालनात पार पडली. मे 2021 मध्ये न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. एप्रिल 2023 मध्ये ती याचिकाही फेटाळण्यात आली. त्यानंतर क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती.
या आहेत तीन शक्यता
1) ही याचिका फेटाळली जाऊ शकते.
2) याचिकेसंदर्भात जयश्री लक्ष्मण पाटील आणि इतर प्रतिवाद्यांना नोटीस जारी केली जाऊ शकते.
3) ही याचिका खुल्या न्यायालयात लढवण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. यासाठीची परवानगी राज्य सरकार आणि विनोद पाटील दोघांनी यापूर्वीच मागितली आहे.