Logo
ताज्या बातम्या

मराठा आरक्षणासाठी आज मोठा दिवस; सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह याचिकेवर आज होणार सुनावणी

आरक्षणासाठी मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत असताना दुसरीकडे आजचा दिवस मराठा आरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिका स्विकारली होती. त्यानंतर आज सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजीव खन्ना आणि न्या. बी. आर. गवई यांच्या दालनात बंद दाराआड होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर इन-चेंबर ही सुनावणी पार पडली होती. दरम्यान, यावेळी राज्य सरकारने सुनावणीत आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे, या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात होती. ज्यात क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारले जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील क्युरेटीव्ह याचिका स्विकारली. पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाची मोबाईल ॲप बंद मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला मंगळवारपासून (23 जानेवारी) सुरुवात झाली. मात्र, गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेली मोबाईल ॲपमध्ये पहिल्याच दिवशी तांत्रिक समस्या उद्भवली. सर्वेक्षण करणाऱ्या प्रगनकांना मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये लॉगिन होताना अडथळा येत आहे. त्यामुळे लॉगिन होत नाही. परिणामी हे सर्वेक्षण अनेक ठिकाणी बंद पडल्याचे चित्र होते. जरांगे मुंबई आंदोलनावर ठाम... मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी यापूर्वी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण केले. यावेळी दोनदा जरांगे यांनी सरकारला वेळ दिला होता. मात्र, त्यानंतर देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न काही सुटला नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यासाठी 20 जानेवारीपासून त्यांनी पायी दिंडी काढली आहे. जरांगे यांनी मुंबई आंदोलन स्थगित करावं अशी मागणी सत्ताधारी नेतेमंडळी आणि मंत्र्यांकडून केली जात आहे. मात्र, आतापर्यंत सरकारला सात महिन्याचा वेळ दिला, यापुढे आता एक तास ही मिळणार नाही, आम्ही मुंबईत आंदोलन करणारच या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत.