Logo
ताज्या बातम्या

युजीसी-नेटचा निकाल जाहीर; कटऑफही जाहीर

पदवी महाविद्यालये अथवा विद्यापीठांमधील व्याख्याता पदासाठी आवश्यक असलेल्या युजीसी-नेट या पात्रता परीक्षेचा निकाल अखेर एक दिवसाच्या विलंबाने जाहीर झाला आहे. तांत्रिक अडणींमुळे हा निकाल लांबला होता. तसेच कटऑफही सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आली. ‘’नॅशनल टेस्टिंग एजन्सी’’ने (एनटीए) ६ ते १९ डिसेंबर, २००२३ या कालावधीत घेतलेल्या यूजीसी-नेट या परीक्षेत देशभरातून ९,४५,९१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे सात लाख मुलांनी परीक्षा दिली. देशभरातील २९२ शहरांमध्ये ८३ विषयांमध्ये यूजीसी-नेट झाली. हा निकाल दि. १७ जानेवारीला जाहीर होणार होता. मात्र, तांत्रिक अडणींमुळे दिलेल्या तारखेला तो जाहीर होऊ शकला नाही. दि. १८ जानेवारीला रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला.  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने एनटीए ही परीक्षा घेते. यात पात्र ठरलेले उमेदवार असिस्टंट प्रोफेसर, ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) याकरिता पात्र ठरले आहेत.  पुरातत्त्व शास्त्र विषयाच्या उत्तरतालिकेत (आन्सर की) अनेक त्रुटी असल्याने हा निकाल लांबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आपले लॉगइन करून पुढील संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. संकेतस्थळ - ugcnet.nta.ac.in किंवा nta.ac.in.