अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. २२ जानेवारी रोजी रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशातील संपूर्ण वातावरण राममय झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज ( दि. १८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम जन्मभूमी मंदिर स्मरणार्थ टपाल तिकिटे जारी करण्यात आली. जगभरातील प्रभू राम यांच्यावर जारी केलेल्या तिकिटांच्या पुस्तकाचे देखील यावेळी प्रकाशन करण्यात आले.
पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेल्या टपाल तिकिटांमध्ये ६ तिकीटांचा समावेश आहे. यामध्ये राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज आणि मा शबरी इ. आहेत. तसेच पोस्ट तिकिटावर चौपई ‘मंगल भवन अमंगल हरी’, सूर्य, सरयू नदी आणि मंदिराच्या आसपासची शिल्पे यांचा देखील समावेश आहे, असे देखील एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
तसेच जगभरातील प्रभू राम यांच्यावर जारी केलेल्या स्टॅम्प बुक प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रभू रामाचे आंतरराष्ट्रीय आवाहन प्रदर्शित करण्याचा हा एक प्रयत्न आहे. जगभरातील प्रभू राम यांच्यावर जारी केलेल्या तिकिटांच्या ४८ पानी पुस्तकात यूएस, न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, कंबोडिया आणि UN सारख्या 20 हून अधिक देश आणि संस्थांनी जारी केलेली तिकिटे समाविष्ट आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे.
आणखी एका कार्यक्रमात सामील होण्याची संधी मिळाली- PM मोदी
यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणाले, “श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा अभियानाने आयोजित केलेल्या आणखी एका कार्यक्रमात सामील होण्याची संधी आज मला मिळाली. आज श्री रामजन्मभूमी मंदिरावरील ६स्मरणीय टपाल तिकिटे आणि प्रभू राम यांच्यावर जगभरातील तिकिटांचा अल्बम जारी करण्यात आला आहे. यासाठी मी देशातील जनतेचे आणि जगभरातील सर्व रामभक्तांचे अभिनंदन करू इच्छितो.