अहिल्यानगर, दि.१२- भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित संवर्धन मोहिमेला १६ मार्च २०२५ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि बौद्धिक परंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांकडे उपलब्ध असलेल्या प्राचीन हस्तलिखितांची माहिती “ज्ञानभारतम” मोबाईल अॅपवर अपलोड करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतात विविध भाषा, लिपी आणि विषयांमध्ये तयार झालेली लाखो हस्तलिखिते विविध संस्था, ग्रंथालये, मठ, मंदिरे, संशोधन संस्था तसेच वैयक्तिक संग्राहकांकडे विखुरलेल्या स्वरूपात उपलब्ध आहेत. या सर्व हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय डिजिटल संग्रह तयार करण्याचा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. यामुळे देशातील मौल्यवान हस्तलिखित वारसा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये देशभरातील शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहकांचा सहभाग अपेक्षित आहे.
हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यमापन, पडताळणी आणि दस्तऐवजीकरणासाठी ज्ञानभारतम हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे माहिती संकलनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालये आणि अभ्यासक यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य नोडल अधिकारी म्हणून पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले हे कार्य पाहणार आहेत. तसेच मराठी भाषा विभागाच्या उपसंचालक अंजली ढमाळ या सहनोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पासाठी काही संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत. त्यामध्ये कवि कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे हे क्लस्टर केंद्र म्हणून तर आनंद आश्रम संस्था, पुणे व भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे हे स्वतंत्र केंद्र म्हणून असणार आहेत. या उपक्रमामध्ये शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संशोधन संस्था, धार्मिक संस्था, स्वयंसेवी संघटना, एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक, विद्यार्थी तसेच वारसा संवर्धन संस्था यांच्या सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.