कोपरगाव : अखेर निष्ठेचा विजय झाला आणि राजकारणात मोठा धमाका झाला! विवेक कोल्हे यांनी आज विधानपरिषदेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करत आपल्या राजकीय पुनरागमनाचा धडाकेबाज बिगुल वाजवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा कोपरगावसाठी ऐतिहासिक ठरला.
“शब्द दिला होता, आणि तो पाळलाच!” असा जोरदार संदेश देत स्नेहलता कोल्हे यांनी फडणवीस आणि अमित शहा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. पक्षाच्या आदेशासाठी स्वतःच्या राजकीय संधीचा त्याग करत विवेक कोल्हे यांनी विधानसभा निवडणूक टाळली आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांना विक्रमी विजय मिळवून दिला. त्या निष्ठेचा आज पक्षाने सन्मान करत त्यांना विधानपरिषदेची संधी दिली.
अर्ज दाखल होताच कोपरगावात जल्लोषाचा अक्षरशः स्फोट झाला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि “कोल्हे साहेब पुढे चला” अशा घोषणांनी संपूर्ण तालुका दणाणून गेला.
या वेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण , कोपरगाव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार स्नेहलता कोल्हे यासह स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवेक कोल्हे यांच्या या दमदार एंट्रीमुळे आता तालुक्यातील राजकारणात नवे समीकरण तयार होणार, हे निश्चित मानले जात आहे.