Logo
शिक्षण

शिक्षकांच्या ताणतणावाला ‘सुरांचा दिलासा’; श्री साई माऊली संस्थेचा कराओके गायन हा विशेष उपक्रम - रेणुका विवेक कोल्हे

कोपरगाव — शिक्षक हा वर्षभर शैक्षणिक व प्रशासकीय कामांच्या प्रचंड ताणात गुंतलेला असतो. मात्र अशा परिस्थितीतही स्वतःचे छंद जोपासत त्यांना व्यासपीठ देण्याचा अभिनव प्रयत्न श्री साई माऊली बहुउद्देशीय संस्थेने केला आणि त्यातूनच आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांसाठी कराओके गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगाव येथे रंगलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सौ. रेणुकाभाभी विवेकभैय्या कोल्हे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शिक्षक प्रचंड ताणतणावातही आपल्या आवडी-निवडी जपतो, आणि त्या छंदाला स्पर्धेचे स्वरूप देणे हा अत्यंत कौतुकास्पद उपक्रम आहे.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा विद्या आढाव होत्या. त्यांनी पुढील वर्षी आणखी भव्य आणि दर्जेदार कार्यक्रम घेण्याचा मानस व्यक्त करत सर्वांच्या सहकार्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष सुधाकर निकुंभ, चंद्रविलास गव्हाणे आणि साबळे सर यांनी प्रभावीपणे केले. प्रास्ताविक संस्थेच्या विश्वस्त सौ. प्रतिभा मनोज सोनवणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन संस्थेचे सचिव महेंद्र विधाते यांनी मानले. या वेळी संस्थेचे विश्वस्त रमेश दरेकर, मनोहर शिंदे, शशिकांत जेजुरकर, विलास गवळी, किरण निंबाळकर तसेच शिक्षक बँकेचे संचालक माणिक कदम, जिल्हा संघाचे कार्यकारी अध्यक्ष मनोज सोनवणे,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आयोजन समितीचे सदस्य चंद्रविलास गव्हाणे, नितीन वाघ, सौ. अनुराधा कैलास सोमासे, अनिल जगताप, संजय रोकडे, सचिन देशभ्रतार आदींनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. कोपरगाव, राहता आणि राहुरी येथील स्पर्धकांनी सहभाग नोंदवत स्पर्धेची रंगत वाढवली. सुरेल सादरीकरणांनी उपस्थितांची मनं जिंकली आणि कार्यक्रमाला उत्साहाची उंची गाठली. 🏆 स्पर्धेतील विजेते: 🥇 प्रथम क्रमांक – श्री सुभाष ओकटु आलाम (कोपरगाव) 🥈 द्वितीय क्रमांक – श्री सुनिल वासुदेव सोनोने (राहता) 🥉 तृतीय क्रमांक – श्रीमती वैशाली धोंडीराम गायकवाड (राहुरी) एकूणच, शिक्षकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांच्या मानसिक ताणाला दिलासा देणारा हा उपक्रम समाजात एक सकारात्मक संदेश देऊन गेला.